न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी, (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- भोसरी एमआयडीसी परिसरात व्यावसायिक भागीदारीच्या नावाखाली तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
फिर्यादी संदीप शंकर गवळी (वय ४६, रा. मोशी, पुणे) यांनी सांगितले की, आरोपी विनोद वसंत चव्हाण (वय ४१) आणि मनोज वसंत चव्हाण (वय ३९) या दोघांनी त्यांचा व मित्रांचा विश्वास संपादन करून “सोमेश्वर भेळ” आणि “सागर प्युअर व्हेज हॉटेल” या व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादीकडून ३० लाख रुपये, तर साक्षीदार रघुनाथ बकाल व प्रवीण विरदे यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेण्यात आले. परंतु व्यवसायातून आलेली रक्कम चालू खात्यावर जमा न करता ती आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. इतकेच नव्हे तर व्यवसाय तोट्यात दाखवून दुकानातील फर्निचर व साहित्य विकून टाकत व्यवसाय बंद केला. यामुळे फिर्यादी व त्यांच्या मित्रांची अंदाजे ८० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोउपनि गुरव करीत आहेत.













