न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत स्वामी विवेकानंद क्रीडांगण, कृष्णानगर येथे कार्यरत अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील तब्बल १० नेमबाजांची गोव्यात होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये एक रौप्य पदकासह ही कामगिरी अधिकच उल्लेखनीय ठरली आहे.
नुकत्याच पुण्यातील शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत तसेच मुंबईत झालेल्या कॅप्टन इजिकल स्पर्धेत या खेळाडूंनी आपली नेमबाजी कौशल्याची चमक दाखवत उत्तुंग यश संपादन केले.
निवड झालेल्या नेमबाजांमध्ये :- श्रवण भगत, स्वरा जाधव, महेश पाडुळे (रौप्य पदक विजेते), अर्शद संदे, ज्ञानदा बुटे, साईराज गव्हाणे, सई मंडलिक, राजवीर साकोरे आणि प्रियांश मिर्धा यांचा समावेश आहे.
या यशाचे श्रेय प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे सर व प्रशिक्षिका भक्ती नारायणकर यांच्या कुशल मार्गदर्शनास जाते. अवघ्या १० महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रशिक्षण केंद्राने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
एकाच वेळी इतक्या नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या नेमबाजी इतिहासातील पहिलीच घटना असून, ही बाब संपूर्ण शहरासाठी अभिमानाची मानली जात आहे. खेळाडूंच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यात ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













