- भाजपमध्ये तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच..
- तरुण नेतृत्वाला भाजपकडून मिळू शकते संधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. 22 नोव्हेंबर 2025) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्षांतील इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत. बंद पडलेली पक्ष कार्यालये पुन्हा सुरू झाली असून कार्यकर्ते व नेतृत्व जोमाने प्रचारयंत्रणा उभारण्यात गुंतले आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग क्रमांक २७ रहाटणीचा आढावा घेतला असता, भारतीय जनता पक्षाचे प्रबळ वर्चस्व असल्याचे स्पष्ट होते. मागील पंचवार्षिक काळात येथे भाजपचा संपूर्ण पॅनेल विजयी झाला होता. त्यामुळे या वेळीही सर्वाधिक इच्छुक भाजपचे तिकिट मिळवण्यासाठीच धडपड करत असल्याचे दिसते.
या अनेक इच्छुकांच्या गर्दीत एक नाव मात्र विशेष चर्चेत आहे — राज दादा हेमंत तापकीर. प्रभागाचा अभ्यास, नागरिकांमधील लोकप्रियता आणि त्यांच्या सततच्या कामाचा ठसा पाहता भाजपकडून राज तापकीर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राज तापकीर यांनी पक्षातील युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पक्षातील वरिष्ठांकडून त्यांच्यावर असलेला विश्वास, प्रभागातील सक्रियता आणि जनसंपर्कामुळे त्यांचे वजन इतर इच्छुकांच्या तुलनेत अधिक जड असल्याचे मानले जाते.
प्रभागातून चंद्रकांत अण्णा नखाते, देविदास तांबे, गणेश नखाते हेही इच्छुक आहेत; मात्र सध्या तरी राज दादा तापकीर यांचे पारडे जड आहे. विशेष म्हणजे, त्यांचा आत्मविश्वास इतका भक्कम आहे की त्यांनी आपल्या वाढदिवशीच आगामी निवडणुकीत उभे राहणार असल्याचे जाहीर करून टाकले.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना संधी देण्याचे धोरण स्पष्टपणे पुढे ठेवले असून त्याचा प्रभाव स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने, रहाटणी प्रभागातही तरुण नेतृत्वाला म्हणजेच राज तापकीर यांना पार्टी संधी देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज तापकीर यांच्याबाबत स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण असून, “पक्षाने संधी दिल्यास निवडणूक जिंकणारा आमचा उमेदवार ठरू शकतो” असा त्यांचा ठाम विश्वास आहे. रहाटणी प्रभागात वाढती स्पर्धा, उत्सुकता आणि राजकीय हालचालींमुळे या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.











