- आमदार शंकर जगतापांचा थेरगावात “अब की बार 100 पारचा” नारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 नोव्हेंबर 2025) :- थेरगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख आणि आमदार शंकर जगताप यांनी “अब की बार 100 पार” हा नारा देत आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जोरदार कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमदारपदाची वर्षपूर्ती आणि निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या मेळाव्यात जगताप यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रत्येक संघर्षात उभे राहता आले, असे सांगितले. 2007 पासूनच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूर अधिवेशनात निळी पूररेषा, अनधिकृत बांधकामे, आरक्षित जागांवरील ताबेदारांचा प्रश्न, वाहतूककोंडी, मेट्रो विस्तार, सेवा रस्ते सुधारणा अशा अनेक विषयांवर त्यांनी आवाज उठविल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
मुळशी धरणातून अतिरिक्त पाणीसाठा उचलणे, पवना–मुळा–इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, अर्बन स्ट्रीट योजना, नवीन एसटी आगार अशा पायाभूत कामांवर आगामी काळात ‘फोकस’ राहणार असल्याचे जगताप म्हणाले.
कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करूनच महापालिका निवडणूक यशस्वी करता येईल, तसेच पुढील वर्षी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या वर्षपूर्तीचा सोहळा याच व्यासपीठावर साजरा करू, असा संकल्पही या मेळाव्यात करण्यात आला.











