- आमदार महेश लांडगे यांची महापालिका आयुक्तांना निवेदन..
- अतिक्रमण कारवाई झाली, मग मतदार यादीत नावे कशी?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रारुप मतदार यादीत कुदळवाडी व परिसर प्रभाग क्रमांक 2 आणि 11 मध्ये झालेल्या स्थळपाहणीबाबत आमदार महेश लांडगे यांनी हरकत नोंदवली आहे. याबाबत महापालिका प्रभारी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना लेखी निवेदन दिले आहे. तसेच, स्थळपाहाणी अहवालाबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत.
आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, महानगरपालिकेने फेब्रुवारी 2025 मध्ये कुदळवाडी परिसरात सुमारे 827 एकर क्षेत्रावर अनधिकृत अतिक्रमणावरील कारवाई केली होती. 8 ते 17 फेब्रुवारी दरम्यान एकूण 4 हजार 111 अतिक्रमण हटवण्यात आले, ज्यामध्ये 3 कोटी 60 लाख 58 हजार 746 चौ.फुट क्षेत्र अवैध अतिक्रमणमुक्त करण्यात आले. “या भागातील जमीनदोस्त केलेल्या मिळकतींवर पूर्वी राहणाऱ्या मतदारांचा उल्लेख स्थळपाहणी अहवालात केला आहे का? किंवा याबाबत कोणतेही अद्ययावत दाखले प्रारुप मतदार यादीमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे या भागातील काही मतदार स्थलांतरीत झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.”
आमदार लांडगे यांनी प्रशासनाला प्रभाग क्रमांक 2 आणि 11 मधील कुदळवाडी अतिक्रमण कारवाई केलेल्या भागात पुनः स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची विनंती केली आहे.
आमदार लांडगे यांनी मांडलेल्या आकडेवारीतून दिसते की: प्रभाग क्रमांक 2 मधील 170, 171, 172 यादी भागांमध्ये 2024 मध्ये 4,048 मतदार होते. प्रारुप यादीमध्ये ४,०७८ मतदारांची नोंद आहे, परंतु योग्य स्थळ निरीक्षण केल्यास फक्त 650 मतदार राहण्याची अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील 62 ते 67 यादी भागांमध्ये २०२४ मध्ये ८,५३६ मतदार होते, तर प्रारुप यादीमध्ये ८,३५० मतदार आहेत; योग्य स्थळ निरीक्षण केल्यास अंदाजे 2,500 मतदार राहण्याची शक्यता आहे.
“महानगरपालिका प्रशासनाने जर स्थळपाहणी केली असेल आणि अहवाल तयार केला असेल, तरी त्यात स्थलांतरीत मतदारांचा उल्लेख झालेला दिसत नाही. ही बाब निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी चिंताजनक आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे ही हरकत नोंदवण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली असून, लवकरात लवकर योग्य पद्धतीने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.










