- प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांसह निवडणुक संबधित अन्य विषयांचा घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२५) :- आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मतदानाचा मूलभूत हक्क अबाधित राहण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद बरोबर व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. यासाठी नागरिकांची माहिती — नाव, पत्ता, वय, सुधारणा, नवीन समावेश आणि वगळण्यात आलेल्या नोंदी — यांची व्यवस्थित पडताळणी होणे आवश्यक आहे. यासाठी प्रारूप मतदार यादीच्या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना प्रभावीपणे स्वीकारून त्या सोडविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रारूप मतदार यादीवरील नागरिकांच्या हरकती व सूचनांचा आढावा बैठक आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, मुख्य अभियंता प्रमोद, संजय कुलकर्णी,ओंभासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, सिताराम बहुरे, संदीप खोत, पंकज पाटील, अतुल पाटील, अमित पंडित, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, तानाजी नरळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, प्रशासन अधिकारी सरीता मारणे, संगीता घोडेकर-बांगर, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर यांनी पुढे सांगितले की, प्रारूप मतदार यादीवरील नागरिकांच्या हरकती व सूचनांचे सूक्ष्म नियोजन ही निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक नागरिकाचा मताधिकार प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी प्राप्त झालेल्या हरकती, दुरुस्त्या आणि सुधारणा मागण्यांचे काटेकोर विश्लेषण करून त्यावर तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून माहितीची पडताळणी, दस्तऐवजांची शहानिशा, पत्ता बदल, नाव दुरुस्ती आणि नवीन नोंदी यासह सर्व बाबींचे व्यवस्थित वर्गीकरण केल्यास मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत राहते. प्रारूप मतदार याद्यावरील नागरिकांच्या हरकती व सूचना योग्य रीतीने पार पाडण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा. या प्रक्रियेत पारदर्शकता, ठोस वेळापत्रक आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद राखल्यास निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि लोकशाही प्रक्रियेची भक्कम पायाभरणी होईल. असे देखील आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.
निवडणुक संबधित अन्य विषयांचा घेतला आढावा.
आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्ट्राँग रूम उभारणी, मतदार यादीतील दुबार नोंदणी हटवणे, मतदान केंद्रांची निश्चिती आणि आवश्यक ठिकाणी तात्पुरती मतदान केंद्रे उभारणे या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्ट्राँग रूम सुरक्षेच्या उच्च मानकांनुसार उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण येऊ नये, पारदर्शकता आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लवकरच मतदान केंद्राची स्वत: पाहणी करणार असल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मतदार केंद्र निश्चित करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.










