- प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर राज्य निवडणूक आयोगाला निवेदन..
- नागरिकांसाठी डिजिटल सुविधा व हेल्पडेस्क सुरू करण्याचीही मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी–चिंचवड (दि. २५ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी २०२५ मधील वाढत्या त्रुटी, विसंगती आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी–चिंचवड भाजपकडून राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन सादर करण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन देत मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करण्याची मागणी केली.
काटे यांनी निवेदनात नमूद केले की, प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील चुका तसेच मतदार यादी तपासण्यासाठी प्रभावी डिजिटल सुविधा उपलब्ध नसणे या सर्व गोष्टींमुळे नागरिकांमध्ये असंतोष व गोंधळ निर्माण झाला आहे.
ते म्हणाले, “मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा मूलभूत हक्क आहे. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेने अशा गंभीर त्रुटींवर तातडीने लक्ष देणे व दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. चुकीच्या माहितीवर आधारित मतदार यादी ही मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेला धक्का देणारी आहे.”
याच पार्श्वभूमीवर, नागरिकांना आपली हरकत व सूचना दाखल करण्यासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी शत्रुघ्न काटे यांनी अंतिम मुदत किमान १० दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी विशेष हेल्पडेस्क, ऑनलाइन शोध सेवा व सहाय्य केंद्र त्वरित सुरू करण्याची विनंतीही आयोगाकडे करण्यात आली आहे.
काटे म्हणाले, “अचूक व निर्दोष मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेची भक्कम पायाभरणी असते. गोंधळाची किंवा अपूर्ण यादी ही नागरिकांच्या न्यायाला घात करणारी ठरते. म्हणूनच पिंपरी–चिंचवडमधील प्रत्येक मतदाराचा विश्वास आणि अधिकार जपण्यासाठी आयोगाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.”
शहरातील अनेक प्रभागांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत असताना भाजपकडून दाखल करण्यात आलेले हे निवेदन महत्त्वपूर्ण ठरत आहे. आगामी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, शुचिता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आयोग कोणती भूमिका घेते याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.









