- पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची पोलिस आयुक्तांसोबत बैठक..
- पोलीस आयुक्तांचे महापालिकेसह कारवाईचे संकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात वाढलेल्या चोऱ्या, अनाधिकृत भंगार दुकाने, बेकायदेशीर माथाडी कामगार संघटना तसेच वाहतूक कोंडी या गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यात सोमवारी (२४ नोव्हेंबर) विस्तृत बैठक पार पडली. पोलिस आयुक्त कार्यालय, चिंचवड येथे झालेल्या या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, संचालक संजय सातव, स्वीकृत संचालक संजय भोसले यांच्यासह पोलिस आयुक्त व डेप्युटी पोलिस कमिशनर उपस्थित होते.
बैठकीत संघटनेने औद्योगिक पट्ट्यात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तळवडे, सोनवणे वस्ती, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ आणि १० तसेच एमआयडीसी भोसरी, पिंपरी, चिंचवड या भागांत गटागटाने येणारे चोरटे सुरक्षा रक्षकांना प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात. अनेक उद्योजकांनी सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक नेमले असूनही अनेक प्रकरणांमध्ये पोलिस तपासात चोर किंवा चोरीचा माल हाती न लागल्याचे त्यांनी सांगितले.
अट्टल गुन्हेगारांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, महिला कामगारांना होणाऱ्या छेडछाडीस आळा बसावा आणि कामगारांच्या येण्याजाण्याच्या वेळेत पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनाधिकृत माथाडी कामगार संघटना उद्योजकांना धमकावत असल्याने उद्योगांना मोठा त्रास होत असून प्रोटेक्शन मनीच्या दबावामुळे अनेक उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची बाबही संघटनेने मांडली.
औद्योगिक क्षेत्रातील चोरी झालेला भंगार प्रामुख्याने अनधिकृत भंगार दुकानातच विकला जातो. त्यामुळे अशा दुकानांवर कायमस्वरूपी कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड व चाकण औद्योगिक क्षेत्रात सकाळ-संध्याकाळ वाहतूक पोलिसांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. कंपन्या सुरू/सुटण्याच्या वेळेत चौकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी विनंती संघटनेने केली.
सन २०१३ मध्ये लघुउद्योग संघटनेने गस्ती पथक योजना राबवली होती, ज्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत ही योजना उद्योजकांना राबवणे कठीण असल्याने ती पोलीस स्टेशनमार्फत लागू करण्याची मागणी करण्यात आली.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, ‘पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत १८०० जणांवर कारवाई करण्यात आली असून ८५३ सराईत गुन्हेगारांवर मोक्का लावून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. कंपन्यांनी गेटवर सीसीटीव्ही बसविल्यास अनाधिकृत माथाडी किंवा संशयित व्यक्तींवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत भंगार दुकाने हटवण्यासाठी महानगरपालिकेसोबत संयुक्त कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
वाहतूक कोंडीबाबत आयुक्तांनी सांगितले की उद्योजकांच्या सहकार्याने अतिरिक्त वाहतूक सहाय्यक नेमून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच कंपनी व्यवस्थापनाला कामगारांच्या सुटण्याच्या वेळेत थोड्या फेरबदलाची विनंती करण्यात येईल. उत्सवकाळात आणि रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवण्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दर तीन महिन्यांनी उद्योजकांसोबत आढावा बैठक घेऊन प्रगतीची माहिती देण्यात येईल आणि पुढील बैठकीत माथाडी संघटना, महापालिका, पीएमआरडीए व एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले.









