- निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील टप्प्यांच्या अंतिम तारखांना मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २६ नोव्हेंबर २०२५) :- राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भातील सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. तांत्रिक कारणांमुळे पूर्वनिश्चित तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, नवीन सुधारित वेळापत्रकानुसार विविध टप्प्यांच्या अंतिम तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने ई-मेलद्वारे सर्व महापालिका आयुक्तांना कळवली आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख आता २७ नोव्हेंबर ऐवजी ०३ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. हरकतीवरील निर्णय घेऊन अंतिम यादी प्रकाशित करण्याची तारीख ०५ ऐवजी १० डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी ०८ ऐवजी १५ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे. केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी १२ ऐवजी २२ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे.
मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्वरित संपर्क साधण्यासाठी आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक व ई-मेलही उपलब्ध करून दिले आहेत. सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी काढला आहे.












