- आरपीआयच्या बळावरच भाजपचा शंभरप्लसचा दावा..
- आरपीआय शहराध्यक्षांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ही भाजपसोबत युती करून भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाव्हळकर म्हणाले की, प्रभागांमध्ये मतदारसंख्या मोठी असल्यामुळे आरपीआयचे चिन्ह व कार्यकर्ते पोहोचवणे कठीण जात होते. त्यामुळे युती मजबूत ठेवण्यासाठी भाजपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय झाला आहे. “युतीसंदर्भात भाजपने प्रस्ताव दिला असून आम्ही त्यांच्याकडे १५ जागांची मागणी केली आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या जास्त असलेल्या प्रभागांत आम्ही उमेदवार देणार आहोत,” असे ते म्हणाले.
मागील निवडणुकीत आरपीआयला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील अन्यायकारक जागावाटप बाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “भाजपच्या प्रत्येक प्रभागात आरपीआयचे कार्यकर्ते काम करत आहेत, त्यामुळे यावेळी आम्हाला न्याय मिळेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले २९ नोव्हेंबर रोजी पिंपरीत येणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विजयी संकल्प यात्रा’ काढली जाणार आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत समन्वयानेच आम्ही मजबूत उमेदवार उतरवणार आहोत, तसेच १०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा दावा आमचा विचार करूनच असल्याचे वाव्हळकर यांनी स्पष्ट केले.












