- निवडणूक प्रक्रिया अखंडित सुरू राहणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिल्ली (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :- राज्यातील ५७ नगरपालिका, नगरपंचायतींसह महानगरपालिका निवडणुकांबाबतची अनिश्चितता दूर करत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट संकेत दिले आहेत की सर्व निवडणुका वेळेतच पार पडणार आहेत. कोणत्याही स्तरावर निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले.
राज्यात सध्या २४७ नगरपालिका, ४२ नगरपंचायती आणि विविध महानगरपालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबविण्याचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत सरळ नाकारला. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांबाबतही कोर्टाने पूर्वीप्रमाणेच निवडणूक कार्यक्रम ठेवण्याचे निर्देश पुन्हा एकदा दृढ केले.
सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश :
🔹 निवडणूक प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत थांबवली जाणार नाही.
🔹 पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी होणार.
🔹 ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याच्या आदेशाची पुनर्पुष्टी.
🔹 महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अंतिम न्यायनिर्णयाच्या चौकटीतच.
या निर्णयामुळे सर्व स्तरावरील स्थानिक स्वराज्य निवडणुकांना गती मिळणार असून प्रशासनाने तयारी अधिक वेगात करण्याचा स्पष्ट संदेश मिळालेला आहे. आता राज्याचे लक्ष २१ जानेवारीच्या सुनावणीकडे केंद्रित झाले आहे.












