- चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण, सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्ह्याचा उलगडा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. १५ डिसेंबर २०२५):- मावळ तालुक्यातील उर्से गावाच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी समीरकुमार सिताराम मंडळ (वय ३२) याला अटक करण्यात आली आहे.
शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते १४ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान गावातील एका कंपनीसमोरील कच्च्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत घडली. पीडित मुलगी (वय ५ वर्षे ३ महिने) हिला अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची तक्रार २७ वर्षीय महिला फिर्यादीने दाखल केली होती.
तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पीडित मुलगी ही तिच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपीसोबत जाताना दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित समीरकुमार मंडळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर आरोपीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीला सोबत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी मूळचा झारखंड राज्यातील गोड्डा जिल्ह्यातील ठाकुरगंठी तालुक्यातील छपरी येथील रहिवासी असून, सध्या तो गावात भाड्याच्या खोलीत राहत होता. या घटनेने संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील तपास शिरगाव पोलिसांकडून सुरू आहे.












