- घटनेमुळे परिसरात खळबळ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. १५ डिसेंबर २०२५):- रावेत परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाला ई-मेलद्वारे वारंवार धमक्या देत डॉलरमध्ये खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे.
रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०३ वाजल्यापासून १४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत रावेत येथील येथे घडली.
फिर्यादी रमेश गणपतआप्पा रूमाले (वय ५४, व्यवसाय नोकरी) यांना तसेच त्यांच्या मुलांच्या ई-मेल आयडींवर अनोळखी व्यक्तीने ई-मेल आयडीवरून धमकीचे मेल पाठवले. पहिल्या मेलमध्ये १० हजार डॉलर, तर त्यानंतरच्या मेलमध्ये ३० हजार डॉलरची मागणी करण्यात आली होती.
यानंतर ८ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घरी कुरिअरमार्फत पत्र व पार्सल पाठवण्यात आले. या पार्सलमध्ये बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू असल्याने एकच खळबळ उडाली. पत्रामध्ये २० हजार डॉलरची मागणी करत गंभीर धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला हा प्रकार खोडसाळपणाचा असावा, असा फिर्यादींचा संशय होता. मात्र, १४ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता पुन्हा धमकीचा मेल येऊन १२ हजार डॉलरची मागणी करण्यात आली. ही रक्कम न दिल्यास २४ तासांत २० हजार डॉलर द्यावे लागतील, अशी स्पष्ट धमकी देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सायबर तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या धमकीच्या संदेशांकडे दुर्लक्ष न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












