- पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारली वेब कास्टिंग सुविधा..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जानेवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ६७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यासाठी वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर मिळून तब्बल ४ हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये वॉर रुम उभारण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, शांतता व पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नोडल अधिकारी तथा सह शहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्या अधिपत्याखाली वेब कास्टिंग सुविधा उभारण्यात आली आहे.
या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्राच्या आतमध्ये १ आणि मतदान केंद्राच्या बाहेर १, तसेच मतदान केंद्र असणाऱ्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर १ असे एकूण ४ हजार ५२८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिकेत उभारण्यात आलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील वॉर रुमद्वारे केले जाणार आहे. या वॉर रुममध्ये नोडल अधिकारी तथा सह शहर अभियंता अनिल भालसाखळे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता महेश कावळे, बाळू लांडे, संतोष दुर्गे यांच्यासह २ उपअभियंते व ८ कनिष्ठ अभियंते यांच्यासह कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.











