- प्रभाग १८ मध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग..
- आयुक्तांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जानेवारी २०२६) :- ‘आचारसंहिता असल्यामुळे कोणीही उमेदवाराचा प्रचार किंवा मतदान करतानाचे फोटो-व्हिडिओ काढू नयेत’, असा उपदेश फेसबुकवर देणाऱ्या भाजप उमेदवाराच्या पतीनेच याआधी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन मतदान करतानाचे फोटो आणि व्हिडिओ थेट सोशल मीडियावर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक १८ मध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना भाजपच्या उमेदवार अपर्णा डोके यांच्या पती निलेश डोके यांच्याशी संबंधित आहे. निवडणूक आयोगाच्या स्पष्ट नियमांनुसार मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई असताना, हा नियम धुडकावून लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मतदान अधिकारी, पोलिस बंदोबस्त आणि बूथवरील नियंत्रण व्यवस्थेच्या भूमिकेवरही संशयाचे सावट निर्माण झाले आहे.
लोकशाहीचा कणा मानली जाणारी मतदान प्रक्रिया गुप्त, निर्भय आणि निष्पक्ष असावी, ही अपेक्षा असताना उमेदवाराच्या निकटवर्तीयांकडूनच नियमांची पायमल्ली झाल्याने विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे म्हणजे केवळ आचारसंहिता भंग नाही, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर पालिका व पोलिस प्रशासन कारवाई करणार की नाही, की सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीचा विषय म्हणून दुर्लक्ष केले जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. मात्र, आधी नियम मोडणे आणि नंतर फेसबुकवरून नियमांची आठवण करून देणे या दुटप्पी भूमिकेमुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ ही म्हण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.












