- विकासकामं, नागरी प्रश्न आणि अन्य महत्त्वाच्या निर्णयांसाठी आता डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा..
- सत्ताधाऱ्यांना सभा पुढे रेटून नेमकं साध्य करायच काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. 15 ऑक्टोबर 2026 :- पुणे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) झालेल्या सभेनंतर पुढील सभा थेट १५ डिसेंबर २०२६ रोजी होणार असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज तब्बल दोन महिने रखडणार आहे.
महापौर रवि लांडगे यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर शर्मिला बाबर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि नगरसेवक मुकेश कोळप उपस्थित होते. सभागृहात नगरसेवकांची उपस्थितीही अल्प होती.
सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर आणि आळंदीतील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी नाना पाटेकर व मधू कांबीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सभा १५ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
तब्बल दोन महिने सर्वसाधारण सभेचे कामकाज रखडणार…!
महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, विविध प्रस्ताव आणि महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता 30 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. असे असताना पुढील सभा नोव्हेंबर महिन्यात न घेता थेट 15 डिसेंबरला होणार असल्याने तब्बल दोन महिने सभा कामकाज थंडावणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून चर्चेला येणाऱ्या विषयांसाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सत्ताधारी भाजपला नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही का? सभा पुढे रेटून नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित होताना दिसत आहे.

















