सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- १८ वर्षांखालील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभर राबविण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान-१४” मोहिमेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ही मोहिम दि. २० जानेवारी २०२६ ते दि. २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आली.
महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते.
सन २०१८ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत हरवलेल्या १८ वर्षांखालील मुलांबाबत नोंद असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार ३० बालके व १८४ बालिका, असे एकूण २१४ जण हरविल्याची नोंद होती. विशेष प्रयत्नांद्वारे या मोहिमेत ११ बालके व ६० बालिका, असे एकूण ७१ जणांचा शोध घेण्यात आला.
तसेच २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दाखल गुन्ह्यांमध्ये २२ बालके व ५० बालिका, असे एकूण ७२ जण हरवले होते. त्यापैकी १६ बालके व ३४ बालिका, असे एकूण ५० जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
एकंदरीत “ऑपरेशन मुस्कान-१४” अंतर्गत एकूण २७ बालके व ९४ बालिका, असे एकूण १२१ हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व गुन्हे शाखेच्या पथकांनी संयुक्तपणे पार पाडली.












