- काही मार्गांवर प्रवेशबंदी, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ फेब्रुवारी २०२६) :- देहूगाव येथे दि. ५ मार्च २०२६ रोजी संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून दि. ४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून दि. ५ मार्च २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) ते देहूगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून सार्वजनिक वाहतूक बसेस व दिंडीतील वाहने वगळण्यात आली आहेत. तसेच मोशी सर्कल, आयटी पार्क चौक, तळवडे चौक, त्रिवेणी नगर चौक, डुडुळगाव चौक आदी ठिकाणांहून देहूकडे जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध असतील. या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक ते इंडोमॅक्स) हा एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार असून काही अंतर्गत रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत.
पार्किंगसाठी आळंदी-तळवडे मार्गावरील माउली वजन काटा, काळोखे-पाटील चौक आदी ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीएमएल बस पार्किंगचीही स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व देहू परिसरात खासगी वाहनांऐवजी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.












