- सावत्र बापाच्या विरोधात लेकाची पोलीसात धाव…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :- निगडी परिसरात घरगुती वादातून घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ओटास्कीम सेक्टर क्रमांक २२ येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी (दि. २६) दुपारी घडलेल्या खळबळजनक घटनेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुलाने आपल्या सावत्र वडिलांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ओटास्कीम हाउसिंग सोसायटी येथे घरगुती कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपी मनोज बाळूभाई राठोड (वय ४९) यांनी पत्नी गायत्री राठोड (वय ३७) यांच्याशी भांडण करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर फरशीवर पाडून त्यांच्या गळ्यातील ओढणीने जोरात गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेची फिर्याद अल्पवयीन मुलगा साई मनोज राठोड (वय १६) याने दिली आहे. त्यानुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.












