- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात जवळपास एकवीसशे कोटींची घट..
- प्रशासकीय कारभारामुळे महापालिकेत वाढला होता बेशिस्तपणा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२५-२६ मधील उत्पन्नाच्या आकडेवारीत मोठी तफावत उघड झाली असून अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल २ हजार ९३ कोटी १२ लाख रुपयांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने ६ हजार २५२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असताना २६ फेब्रुवारीअखेर प्रत्यक्षात ४ हजार १५८ कोटी ८८ लाख रुपये इतकीच रक्कम जमा झाली आहे.
सर्वाधिक तूट भांडवली जमा, करसंकलन व बांधकाम परवाना विभागात दिसून आली आहे. भांडवली जमा या घटकात १ हजार ३२ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १०१ कोटी ५ लाख रुपये जमा झाले असून ९३० कोटी ९५ लाखांची तूट आहे. करसंकलन विभागात १ हजार ५० कोटींच्या अपेक्षेपैकी ४८७ कोटी ९५ लाख रुपये जमा झाले. बांधकाम परवाना विभागात ७०० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४२० कोटी ५३ लाख रुपये जमा झाले आहेत.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) परताव्यात २ हजार ५८२ कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २ हजार ३६७ कोटी २० लाख रुपये जमा झाले असून २१४ कोटी ८ लाखांची घट आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंतर्गत अपेक्षित २०० कोटींच्या तुलनेत कोणतीही रक्कम जमा झालेली नाही.
दरम्यान, या तुटीबाबत महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आशावादी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, “महापालिकेच्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात एकूण ६ हजार २५२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र २६ फेब्रुवारीपर्यंत ४ हजार १५८ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले आहेत. उत्पन्न अखेरच्या मार्च महिन्यात ४०० ते ५०० कोटी रुपयांनी वाढेल, अशी आशा आहे.”
महापालिकेच्या अर्थकारभारातील ही मोठी तूट लक्षात घेता मार्चअखेर प्रत्यक्ष किती उत्पन्न जमा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि दैनंदिन खर्च यावर या आर्थिक परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











