- पोलिसांची दिखावू कारवाई संशयास्पद?..
- वेश्या-लॉज मालक आणि पोलीसांमध्ये कनेक्शन असल्याची चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :- तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट समोरील परिसरात सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी बहुतांश देहविक्रेय करणाऱ्या महिला उभ्या राहून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना प्रवृत्त करीत असल्याच्या सर्रास घटना घडत आहेत.
पोलिसांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली, तरी काही दिवसांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी त्या महिलांचा खुलेपणाने वावर सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांची कारवाई केवळ देखावा ठरत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
तसेच या महिलांचे परिसरातील काही लॉज मालकांशी व्यवसायिक कनेक्शन असल्याचेही बोलले जात आहे. संबंधित महिलांचा देखील विशिष्ट लॉजकडेच ग्राहकांना नेण्याचा हट्ट असतो, अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे या प्रकारामागे लॉज मालक आणि इतर घटकांचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत काय, असा सवाल जाणकार नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गालगतचा हा भाग वाहतुकीचा आणि वर्दळीचा असल्याने अशा प्रकारांमुळे सार्वजनिक शिष्टाचार व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ दिखाऊ कारवाईपुरते मर्यादित न राहता सातत्यपूर्ण आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.












