- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; महापालिकेकडून ५६.१० कोटींची तरतूद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिचंवड (दि.१० मार्च २०२६) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार मिळणारा थकीत वेतन फरक लवकरच देण्यात येणार असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ४० टक्के हिस्स्यानुसार ५६.१० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले.
सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरक देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्या हप्त्याचे वितरण यापूर्वी पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या हप्त्याबाबत विलंब झाला होता. याबाबत आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
तत्कालीन आयुक्त शेखर सिंह व विद्यमान आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर फरकाची रक्कम चार हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या हप्त्यासह उर्वरित दोन हप्तेही लवकर वितरीत केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम योग्य वेळी मिळणे महत्त्वाचे असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.












