- चिंचवडनंतर पुनावळेत भरधाव वाहनाच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू..
- वाहतूक पोलीस झोपा काढतात काय? सर्वसामान्य नागरिकांचा सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ मार्च २०२६) :-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड वाहनांचा हैदोस सुरूच असून, आता ‘हायवा’ ट्रक सर्वसामान्यांसाठी अक्षरशः यमदूत ठरू लागले आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे जड वाहनांच्या वेगावर आणि त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेवर कडक निर्बंध आणण्याची मागणी जोर धरत आहे. निषिद्ध वेळेतही ही अवजड वाहने भरवस्तीत कसे शिरतात? वाहतूक पोलीस झोपा काढतात का? असा सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करू लागली आहेत.
दरम्यान चिंचवडगावातील घटनेनंतर पुनावळे येथील एका इंटरनॅशनल स्कूलसमोर शनिवारी (१४ मार्च) सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात १५ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. स्वप्नील पिंटू चव्हाण (वय १५ वर्षे २ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?…
फिर्यादी लक्षदीप दिलीप राठोड (वय १७) आणि त्याचा मित्र स्वप्नील चव्हाण हे दोघे दुचाकीवरून घरी परतत होते. सकाळी ९:४५ च्या सुमारास, जांभेकडे जाणाऱ्या रोडवर मागून येणाऱ्या एका भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, स्वप्नीलला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर लक्षदीप किरकोळ जखमी झाला आहे.
नियमांची पायमल्ली आणि पोलिसांची कारवाई…
सकाळी ९:४५ ची वेळ ही जड वाहनांसाठी निर्बंधाची वेळ असतानाही, आरोपी ट्रक मालक किरण मोहनराव काकडे (रा. तळेगाव दाभाडे) याने आपला ट्रक चालक समाधान रामदास माने (वय २७) याच्या ताब्यात दिला. चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, बेदरकारपणे ट्रक चालवून हा अपघात घडवून आणला. रावेत पोलिसांनी चालक समाधान माने याला अटक केली असून, मालक किरण काकडे याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक टार्फे अधिक तपास करत आहेत.


















