न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. ७) रोजी दुपारी सातजणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिखली पोलिसांसोबत या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत आहे.
पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील तिसरा आरोपी केएसबी चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मुकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. यापूर्वी अटक केलेल्या देवेंद्र आणि सॅमसन या दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुकेश प्रल्हाद कांबळे (वय १९, रा. बोपोडी) असे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी देवेंद्र रामलाल बीडलानी (२०, रा. आंबेडकर चौक, औंध) आणि सॅमसन सुलेमान अँमेन्ट (२०, कमान फॅक्ट्री, खडकी) या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, सचिन उगले, विशाल भोईर, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.
पोलीस तपासाची दिशा बदलत आहेत. माझ्या ऑफिसमध्ये कसलाही वाद नाही. माझ्याकडे मुलगी कामाला आहे. मुलगा कामाला नाही. कोणी तरी मोठा माणूस यामागे आहे. खरा सूत्रधार दाद्विण्यासाठी खरा खटाटोप आहे, असे मला दिसतयं. ऑफिसमध्ये वाद होण्याचे काहीच कारण नाही ते वीजबील भरणा केंद्र आहे. तपासाची दिशा चुकीची चालू आहे. खरे कारण पुढे यावे ही माझी पोलीस यंत्रणा यांना विनंती. मला मारण्याचा प्लान होता, अशी मला माझ्या सूत्रांकडून महिती मिळाली आहे.
– दत्ता साने (विरोधी पक्षनेते, पिं. चिं. मनपा)

















