न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०१९) :- लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षात युती होणार आहे. आमच्यात निम्म्या-निम्म्याचा फॉर्म्युला ठरला असून निवडणुकीत विधानसभेवर भगवाच फडकेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.10) झाले. त्यानंतर संत तुकारामनगर येथे दानवेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले. त्यामुळेच घवघवीत यश मिळाले.
विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती होणार आहे. आमचा निम्म्या-निम्म्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपा -सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन आम्ही जागा वाटपा संदर्भात निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत मताधिक्य असलेल्या २८८ विधानसभा मतदार संघात भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला


















