- चिमुरडीवरील अत्याचाराने शहर हादरले..
- आरोपीस कठोर शिक्षा व्हावी; आमदारांसह माजी महापौरांची पोस्ट चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ एप्रिल २०२६) :- मोशी परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अवघ्या सात वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील आरोपी राम कंजल निसाद (वय ४०) याने केलेल्या अमानुष कृत्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत आमदार महेश लांडगे, तसेच माजी महापौर राहुल जाधव यांच्या नावे आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीची पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
“अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळाल्यासच समाजात वचक निर्माण होईल,” अशी भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी एकत्र येत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










