- तरीही पिंपरी-चिंचवडकर शांत?..
- नागरिकांच्या मौनाची भूमिका ठरतेय कळीचा मुद्दा…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना खरंच आपल्या शहराबद्दल प्रेम आणि अभिमान आहे का? की शहराच्या अस्मितेचा प्रश्न आता फक्त राजकीय पक्षांपुरताच मर्यादित राहिला आहे? असा सवाल पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या “पिंपरी-चिंचवडला कोण ओळखते?” या एका वादग्रस्त वक्तव्यावरून उपस्थित झाला आहे.
प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती, नियोजनबद्ध विकास आणि वेगाने वाढणारी पायाभूत सुविधा यामुळे शहराने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. देश-विदेशात औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून प्रस्थापित झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे वास्तव्यास आले आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले प्रकल्प उभारले आहेत. नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा आणि वेगाने होणारी शहरी वाढ यामुळे पिंपरी-चिंचवडला जगभरात आदर्श शहर म्हणूनही ओळख मिळाली आहे.
आयुक्तांचे वक्तव्य खेदजनकच नव्हे, तर शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे…
अशा परिस्थितीत आयुक्तांचे वक्तव्य केवळ खेदजनकच नव्हे, तर शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे ठरत आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली. आमदारांसह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवत आयुक्तांकडून माफीची मागणी केली. मात्र एवढा वाद निर्माण होऊनही आयुक्तांकडून साधी दिलगिरीही व्यक्त करण्यात आलेली नाही. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये एवढा मोठा शहराच्या अस्मितेचा मुद्दा समोर येऊनही पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिक शांत का? शहराच्या अस्मितेचा प्रश्न असतानाही नागरिकांची ही शांतता अनेक प्रश्न निर्माण करत आहे. ही उदासीनता आहे का, की परिस्थितीकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन? शहराच्या सन्मानासाठी आवाज उठवणं ही केवळ नेत्यांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जर नागरिकांनीच मौन बाळगलं, तर अशा वक्तव्यांना भविष्यात देखील खतपाणी मिळतच राहील.
कुठ केलं वादग्रस्त वक्तव्य?…
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका संगीत स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत “पिंपरी-चिंचवडला कोण ओळखते?” असे वक्तव्य केलं होतं. ‘गांधर्व मंचला जगभरात ओळख आहे, मात्र पिंपरी-चिंचवड शहराला ओळख नाही,’ असे त्यांनी म्हटलं होतं. अद्याप या वक्तव्यावर त्यांनी कुठलाच खुलासा केलेला नाही, हे विशेष.










