- भारतीय साहित्याचा सांस्कृतिक प्रवाह विस्तृत करणार – गिरीश प्रभुणे…
- ‘कलारंग’तर्फे साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा थाटात…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड येथे ‘कलारंग’ सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ‘सारस्वतांचा गौरव सोहळा’ निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तसेच कार्यकारिणीतील सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, अंजली कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, माधव राजगुरु, डॉ. नितीन संगमनेरकर, डॉ. आशुतोष जावडेकर, राजन लाखे, पुरुषोत्तम काळे आणि प्रभाकर ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. आमदार अमित गोरखे यांनी १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडमध्ये व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहराची क्षमता आणि साहित्यप्रेमींचा उत्साह पाहता यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष योगेश सोमण यांनी भाषेचे संवर्धन आणि तरुणांना साहित्याशी जोडणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. १६,९०० सदस्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांत सर्वसमावेशक काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तरुणांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘अभिवाचन’सारख्या कार्यशाळा राबवण्याचा मानस त्यांनी मांडला.
गिरीश प्रभुणे यांनी साहित्य परिषदेला भारतीय अस्मितेशी जोडणारा प्रवाह पुढे नेण्याचे आवाहन केले. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आणि चोखामेळा यांच्या परंपरेतून साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे, असे ते म्हणाले.
या सोहळ्याचे आयोजन आमदार अमित गोरखे, शैलेश लेले, आशा नेगी, संजना मगर, राम गायकवाड, प्रवीण पोळ आणि मुकुंद वेदपाठक यांनी केले. निवेदन रविंद्र खरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संयोगिता खुडे यांच्या पसायदानाने झाली.


















