- परवानगीशिवाय उभारलेले होर्डिंग जमीनदोस्त; कारवाईचा इशारा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १५ एप्रिल २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंगविरोधात धडक मोहीम सुरू करत हिंजवडी येथील एक मोठे होर्डिंग जमीनदोस्त केले. गट क्रमांक २०६ मधील सुमारे १२५० चौरस फूट क्षेत्रावरील लोखंडी सांगाडा नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. संबंधित होर्डिंगसाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती.
प्रभारी सहआयुक्त हिंमत खराडे यांनी इशारा दिला की, अनधिकृत होर्डिंगधारकांवर कारावास व दंडाची कारवाई होऊ शकते. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भविष्यातही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.














