- ते दोघं देशी बनावटीच्या पिस्तुलांसह जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि.१६ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही, बेकायदेशीररीत्या दोन देशी बनावटीची पिस्तुलं आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन तरुणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१५ एप्रिल) पहाटे औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊस परिसरात करण्यात आली.
साहिल दत्तात्रय साष्टे (वय १९, रा. कोथरुड) आणि साई विठ्ठल वाशिवले (वय १९, रा. कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना, त्यांना औंध जिल्हा रुग्णालयाजवळील जुनी सांगवी परिसरात दोन तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे बेकायदेशीर रित्या बाळगलेली शस्त्रे सापडली.
दोन देशी बनावटीची पिस्तुलं: किंमत अंदाजे १,००,००० रुपये, चार जिवंत काडतुसे: किंमत अंदाजे ४,००० रुपये, होंडा ॲक्टिव्हा (काळ्या रंगाची): किंमत अंदाजे ५०,००० रुपये, पोलिसांनी एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई आकाश दत्तात्रय खंडागळे यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहर परिसरात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई केली असतानाही, या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे तरुण इतक्या पहाटे पिस्तुलं घेऊन कोथरुडमधून सांगवी परिसरात का आले होते आणि त्यांचा नेमका काय कट होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.










