- शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१६ एप्रिल २०२६) :- शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कडक उपाययोजना केल्या जात असतानाच, पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. पिंपरी स्मशानभूमीच्या समोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१५ एप्रिल) सायंकाळी ५:२० वाजेच्या सुमारास पिंपरी स्मशानभूमीसमोरील पत्राशेडच्या मागे एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद रितीने वावरत होता. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रोहित रघुनाथ वाघमारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यात ५०,५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल विनापरवाना मिळून आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी १५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीपासून २८ एप्रिल २०२६ पर्यंत शहरात कोणतेही घातक शस्त्र बाळगण्यास मनाई करणारे बंदी आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेशातील सेंधवा येथील प्रतापसिंग (वय अंदाजे ५४ वर्ष) नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्रतापसिंग याच्यावरही गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे करत आहेत.










