- किवळे परिसरात पाहणी; एसटीपी सक्ती व दंडात्मक कारवाईचे निर्देश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- किवळे परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेज व आसपासच्या सोसायट्यांकडून नाल्यांद्वारे पवना नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तात्काळ कडक कारवाईचे आदेश दिले.
महापौरांनी सात दिवसांत सर्वेक्षण करून नियमभंग करणाऱ्या सोसायट्यांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. एसटीपी असूनही बंद असलेल्या प्रकल्पांना त्वरित सुरू करून, बेकायदेशीर जोडण्या तोडण्यास सांगितले. तसेच पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड व गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
सांडपाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचेही आदेश देण्यात आले.
ही मोहीम संपूर्ण शहरात राबवून इंद्रायणी, मुळा व पवना नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी समन्वयाने काम केले जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.











