न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २१ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम उघडण्यात आली आहे. दक्षिण म्हाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘कल्याण’ नावाचा मटका आणि जुगाराचे अड्डे चालविणाऱ्या रफिक शगीर काझी (वय ३९) या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
आरोपी रफिक काझी (रा. काजीवाडा, चाकण) हा गेल्या अनेक दिवसांपासून म्हाळुंगे परिसरात अवैध जुगार अड्डे चालवत होता. त्याच्यावर आतापर्यंत एकूण १८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता.
पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी करून काझी याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला शोधून काढले.
दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी आरोपी रफिक काझी याला ताब्यात घेऊन त्याची मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर, शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त विशाल हिरे, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.











