न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २१ एप्रिल २०२६) :- “मी इथला भाई आहे, मी तडीपार होतो हे तुला माहीत नाही का?” असे म्हणत परिसरात दहशत माजवून एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना निगडी येथे घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी वेगाने हालचाली करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
फिर्यादी ऋषीकेश रामचंद्र जाधव (वय १९, रा. आकुर्डी) हे दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास निगडी येथील संजय काळे ग्राऊंडजवळील ‘अनिल आर्ट्स’ या दुकानासमोर ग्राहकाच्या गाडीची नंबर प्लेट बसवण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी योगेश राम मानकेश्वर आणि आकाश धुमाळ तिथे आले.
दोन्ही आरोपींनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. ऋषीकेश यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपींनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ऋषीकेश यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे.
मारहाण सुरू असतानाच आरोपी योगेश मानकेश्वर याने ऋषीकेश यांच्या खिशातील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीने आपले पैसे परत मागण्यासाठी विनंती केली असता, योगेशने जवळ पडलेली काठी उगारून, “मी इथला भाई आहे” असे ओरडत परिसरात दहशत निर्माण केली.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आल आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तळे या करत आहेत.
परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनीकडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.











