- ‘कारवाई की पडदा’; शहरवासियांचे आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत उघडकीस आलेल्या ५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याने प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनांच्या आधारे नियम धाब्यावर बसवत निधी वितरित केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका रात्रीत ७० हून अधिक कामांची बिले २० ठेकेदारांना अदा करण्यात आली, ज्यामुळे संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त पाच सदस्यीय समितीने अहवाल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मंगळवारी सादर केला असला, तरी त्यात नेमकी कोणावर कारवाईची शिफारस आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्राथमिक माहितीनुसार, जैन यांनी वित्तीय शिस्त मोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता आयुक्त कठोर पावले उचलतात की संबंधितांना अभय देतात, याकडे शहराचे लक्ष लागले असून, कारवाई टाळल्यास संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.










