- मराठीविरोधी संप ‘फ्लॉप’ ठरणार; सदावर्तेंवर डॉ. बाबा कांबळे यांचा घणाघात
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ एप्रिल २०२६) :- महाराष्ट्रात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायत आक्रमक झाली आहे. कष्टकऱ्यांचे नेते व रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन करत, विरोध करणाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे.
राज्य सरकारने १ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक केली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी पुकारण्यात आलेल्या संपाला डॉ. कांबळे यांनी विरोध दर्शवला. “मराठीला विरोध करणारा हा संप पूर्णपणे अपयशी ठरेल. रिक्षा चालकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत त्यांनी “मराठीला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे,” असे म्हटले. बोगस परमिट प्रकरणावरही त्यांनी लक्ष वेधत, मुंबई व पिंपरी-चिंचवड परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या परवान्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २३ एप्रिल रोजी कुदळवाडी-चिखली येथे रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.
मराठी अस्मिता आणि स्थानिक हक्कांच्या मुद्द्यावरून पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











