- नियम धाब्यावर बसवून नऊ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजूरी?..
- भाजपचा पारदर्शक कारभार चहाट्यावर…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले. कोणतीही पूर्वसूचना किंवा विषयपत्रात उल्लेख नसताना २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल ९,३२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सभेच्या सुरुवातीला केवळ दिवंगत गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषय निश्चित असताना, अचानक इतर विषयांची घुसखोरी करण्यात आली. नारीशक्ती वंदन विधेयकाच्या निषेधाच्या आडून अर्थसंकल्प मंजुरीचा मुद्दा पुढे आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नियमाप्रमाणे कोणताही विषय सभागृहासमोर मांडण्यासाठी आवश्यक संमती न घेता तो मंजूर कसा होतो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सत्ताधाऱ्यांनी उपसूचना ग्राह्य-अग्राह्य करत थेट संपूर्ण अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिल्याचे जाहीर केले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही खासगीत असा कोणताही प्रस्ताव नसल्याची बाब खासगीत बोलताना मान्य केली.
सभेच्या अखेरीस नारीशक्ती विधेयकाच्या मुद्द्यावरूनच सभा ५ मेपर्यंत तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, या सगळ्या घडामोडीत महत्त्वाच्या आर्थिक निर्णयाला ज्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली, त्यावरून सत्ताधाऱ्यांचा कारभार किती बेफिकीर आणि नियमबाह्य आहे, याचे स्पष्ट दर्शन घडल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.











