एमडीसह १३.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार व सह पोलीस आयुक्त (गुन्हे २) प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खालुंब्रे (ता. खेड, जि. पुणे) येथील जोपादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित दुचाकीस्वारांना थांबवून तपासणी केली असता, आरोपी शिशुपाल चौधरी (२५) व रामदिन चौधरी (२४) यांच्या ताब्यातून ११६.५४ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. यासोबतच तीन मोबाईल व एक मोपेड असा एकूण १३.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तपासादरम्यान या आरोपींना मेफेड्रॉन पुरवठा करणारा परविण चौधरी (२२, रा. वडगाव मावळ) यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जासभाये करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी सहकार्य केले.
दरम्यान, नागरिकांनी अंमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक (८६००००२३२०), पोलीस हेल्पलाईन ११२ किंवा ‘मानस’ हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.










