- परिस्थिती हाताळताना महापौरांची दमछाक..
- परिस्थिती हाताबाहेर जाताच स्टँडिग चेअरमन अनं पक्षनेत्यांचा हस्तक्षेप..
- प्रभाग १९ मधील नगरसेवक निष्क्रिय?…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २४ एप्रिल २०२६) :- चिंचवड स्टेशन परिसरातील एम्पायर इस्टेट सोसायटीत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून निर्माण झालेला वाद महिनाभरात तब्बल आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर चांगलाच चिघळला असून अखेर हा प्रश्न महापालिकेतील महापौरांच्या दालनात पोहोचला. संतप्त नागरिकांनी महापौर कार्यालय गाठले. स्थानिक स्तरावर वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांना थेट महापालिकेत धाव घ्यावी लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
महापौर रवि लांडगे यांच्या दालनातच कुत्र्यांना खायला घालणारे स्वयंसेवक आणि कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिक आमनेसामने आले. एकाच सोसायटीतील या दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्वयंसेवकांनी प्राणीसंवर्धनाच्या दृष्टीने ठराविक डॉग फीडिंग पॉईंट निश्चित करण्याची, कुत्र्यांचे निर्बीजीकरण (ABC) आणि रेबीज लसीकरण नियमित करण्याची मागणी केली. दुसरीकडे, स्थानिक रहिवाशांनी वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे सांगत तातडीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी लावून धरली.
परिस्थिती हाताळताना महापौरांची मोठी कसोटी लागली. त्यांनी दोन्ही बाजूंची मते शांतपणे ऐकून घेत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहत त्यात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे व पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि वातावरण निवळवण्यास मदत केली.
या प्रकरणी उपायुक्त संदीप खोत यांना तातडीने डॉग फीडिंग पॉईंट निश्चित करणे, अधिकृत फीडर्सची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे, तसेच निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, संबंधित भागात नियमित पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, या सर्व उपाययोजनांनंतरही दोन्ही गटांतील नागरिक पूर्णपणे समाधानी नसल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान प्रभाग क्रमांक १९ मधील विद्यमान चारही नगरसेवक ही समस्या सोडवण्यात कमी पडले. स्थानिक नगरसेवकांनी वेळेत लक्ष दिले असते तर परिस्थिती एवढी चिघळली नसती, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. परिणामी, या प्रश्नावर पुढील काही दिवसांतही वाद कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांवरून सोसायटीत वाद सुरू आहेत. नागरिकांची सहनशीलता संपत चालली आहे. कुत्र्यांवरून नागरिकांची दररोज भांडणे होत आहेत. वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. महापालिकेने त्वरीत ही समस्या निकाली काढावी.
– शैलेश मोरे, माजी नगरसेवक मनपा…










