- महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन; ग्रामीण खेळाडूंना मोठे व्यासपीठ
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दि. २५ एप्रिल २०२६ :- पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथे आमदार चषक जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप २०२६ ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात ग्रामीण खेळाडू विकास प्रकल्प व आमदार उमा खापरे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना महापौर लांडगे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्त्व देण्याचे आवाहन केले. खेळामुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. तसेच क्रीडा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, सभापती कैलास कुटे, नगरसदस्य अमित गावडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाविषयी आकर्षण वाढणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.











