न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २७ एप्रिल २०२६) :- अंमली पदार्थांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे गांजा बाळगणाऱ्या एका तरुणावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८,८०० रुपये किमतीचा १७६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
दिनांक २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७:०० वाजेच्या सुमारास, चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळवडे भागातील सोनवणे वस्ती येथे ही कारवाई करण्यात आली. भोसले वजनकाट्याजवळील श्री मेडिकलच्या समोर असलेल्या सार्वजनिक रोडवर आरोपी संशयास्पद रित्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणी पोलिसांनी साहील राहुल चौरे (वय २० वर्षे) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या रावेत भागात राहत असून, तो मूळचा परळी वैजनाथ (जि. बीड) येथील रहिवासी आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे हवालदार कंठय्या गुरय्या स्वामी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीकडे १७६ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने, विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मोटे करत आहेत.











