न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २७ एप्रिल २०२६ ) :- गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाची ९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात ‘अखंड भारत मल्टीट्रेड प्रा.लि.’ (ABMPL) या कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिनाथ सुखदेव वारे (वय ३५, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पुष्पेंद्र मौर्य, सत्यप्रकाश मौर्य, चंद्रहास शर्मा (सर्व संचालक), समीर राहणे (प्रमोटर) आणि एका महिला कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि MPID कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
पहिली गुंतवणूक: १८ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडी येथील हॉटेल हिल्टनमध्ये आरोपींनी फिर्यादीकडून १ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले.
दुसरी गुंतवणूक: ३ मार्च २०२५ रोजी वाकड येथील हॉटेल टिप-टॉप येथे ८ लाख रुपये गुंतवणूक म्हणून घेतले.
आरोपींनी सुरुवातीचे काही दिवस गुंतवणुकीवर परतावा दिला. मात्र, त्यानंतर परतावा देणे बंद केले आणि मुद्दलही परत केली नाही.
फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांची एकूण ९,५०,००० रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) साळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत











