- माता रमाई स्मारक भूमिपूजनपूर्व पाहणी..
- काम दर्जेदार करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्पाची राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. उद्या २८ एप्रिल रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सह शहर अभियंता मनोज सेठीया यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बनसोडे म्हणाले की, हे स्मारक केवळ वास्तू नसून आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या प्रकल्पातून माता रमाई यांच्या त्यागाचे प्रभावी दर्शन घडेल.
सुमारे २४९८.९७ चौ.मी. क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात आकर्षक म्युरल्स, पुतळा, लँडस्केप गार्डन, डिजिटल माहिती प्रणाली आणि दिव्यांगांसाठी सुविधा असणार आहेत. हे स्मारक शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे परिमाण देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.










