न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाला अॅक्शन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनधिकृत जाहिराती, अतिक्रमणे, बेकायदेशीर नळजोडण्या आणि परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांवर अधिक तीव्र आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे. भिंती, खांब आणि डीपीवरील अनधिकृत बॅनर तात्काळ हटवून संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “अतिक्रमणमुक्त फुटपाथ” मोहिमेला गती देत पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी अनधिकृत नळजोडण्या शोधून त्यावर थेट कारवाई केली जाईल. परवानगीशिवाय सुरू असलेली बांधकामे हटवण्यात येणार असून नागरिकांनी घर खरेदी करताना अधिकृत परवानगीची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन, विलगीकरण आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.











