- नामवंत गायक-वादकांचा सहभाग, प्रवेश विनामूल्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- भारतीय संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जादुई स्वरांना मानवंदना देण्यासाठी ‘सूर आशा – A Tribute to Asha Bhosle’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
मोरया थिएटर्स निर्मित या कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिद्धिविनायक ग्रुप आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना व प्रस्तुती अ.भा. मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती) चे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची आहे.
कार्यक्रमात कोमल कृष्णा, राधिका अत्रे, मानसी भोईर घुले, हिम्मत कुमार पंड्या आणि प्रशांत साळवी हे गायक आशा भोसले यांच्या अजरामर गीतांचा सुरेल आविष्कार सादर करणार आहेत. त्यांना चिंतन मोडा, हार्दिक रावल, विजू मूर्ती, सईद खान, असिफ खान आणि अभिजित भिडे यांचा वाद्यवृंद साथ देणार आहे. डॉ. अमित त्रिभुवन सूत्रसंचालन करणार असून ‘म्युझिक व्हिजन’, विजय चेन्नूर आणि विक्रम क्रिएशन तांत्रिक जबाबदारी सांभाळणार आहेत.
हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णतः विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशिकांसाठी राजू बंग (९८२२३१३०६६) किंवा प्रशांत साळवी (७८७५४५८५५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजक भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.











