- मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबई येथील ‘देवगिरी’ निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार तसेच राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली.
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहराला संधी देण्याबाबत सर्वानुमते शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांचे नाव पुढे करण्यात आले. यासंदर्भात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखी निवेदन सादर केले.
योगेश बहल यांनी सन १९९२ पासून आतापर्यंत सलग सात वेळा निवडून येत एक अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक म्हणून कार्य केले आहे. त्यांनी शहराध्यक्ष, महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत सर्वसामान्य नागरिकांची सेवा केली आहे. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि महानगरपालिकेत सत्ता आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळेच ते स्व. अजितदादा यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळालेले नाही. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून आरक्षित असल्याने बहल यांना इतर संधी मिळालेल्या नाहीत. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा विचार करून त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि महानगरपालिका तसेच प्रशासनाच्या माध्यमातून प्रभागातील कामे प्रभावीपणे करण्यासाठी विधान परिषदेवर पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे. योगेश बहल यांच्या माध्यमातून ही संधी दिल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल आणि पक्षाची ताकदही वाढेल.
पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. हे एक कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने बहल यांच्यासारख्या अनुभवी आणि अल्पसंख्याक प्रतिनिधीला संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी डॉ. वैशाली घोडेकर, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतिक्षा जवळकर-लांघी, दिप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, रविंद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दिपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











