न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २८ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट्स चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरी करणाऱ्या चार आरोपींसह मुद्देमाल विकत घेणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चाकण नगरपरिषद हद्दीतील राक्षेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २१० घरांच्या बांधकामाचे काम सुरू आहे. या साईटवरून १० एप्रिल ते १६ एप्रिल च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सेंट्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या २० लाख रुपये किंमतीच्या २८० स्क्वेअर मीटर अॅल्युमिनियम प्लेट्स चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ३) मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी तपास पथकाला सूचना दिल्या होत्या. घटनेच्या ठिकाणी तपास करत असताना पोलिसांना एक बेवारस मोटारसायकल मिळून आली. त्या मोटारसायकलचा तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०, रा. सुसगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली.
रामरक्षा उर्फ राजू धर्मराज पासवान (वय ४०),स्वराज शांताराम कालापाड (वय २३), स्वप्नील शांताराम कालापाड (वय २५), अक्रम रफिकउल्ला खान (वय २८)
या चौघांना येलवडी (ता. खेड) येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या अन्य तीन आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चोरलेल्या अॅल्युमिनियमच्या सेंट्रिंग प्लेट्ससह, चोरीसाठी वापरलेली दोन चारचाकी वाहने आणि दोन मोटारसायकल असा एकूण ३१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे करत आहेत.












