न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २८ एप्रिल २०२६) :- जमिनीचे वाटप आणि पाईपलाईनच्या मोबदल्यातून मिळालेल्या पैशांच्या वादातून ४४ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे घडली आहे. रविंद्र उर्फ रवि जाधव (वय ४४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांचे दोन अनोळखी साथीदार अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ एप्रिल रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास नवलाख उंब्रे येथील जाधववाडी, जांभळीचे रान भागात घडली. फिर्यादी (मृत रविंद्र यांची आई) यांच्या घराबाहेर आरोपींनी हे हत्याकांड घडवून आणले.
आरोपी विशाल जाधव आणि त्याचे तीन साथीदार एका गाडीतून फिर्यादींच्या घरासमोर आले. पीएमआरडीए (PMRDA) पाईपलाईनचे मिळणारे पैसे आणि जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी रविंद्र यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी विशाल जाधव आणि त्याच्यासोबत असलेल्या एका इसमाने हातातील तीक्ष्ण कोयत्याने रविंद्र यांच्या मान, गळा, खांदा, तोंड आणि डोक्यावर घाव घातले. या भीषण हल्ल्यात रविंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणात तत्परता विशाल सुखदेव जाधव (वय २१, रा. खेड कोर्टाजवळ, राजगुरुनगर), ओमकार किरण सोळसे (वय २२, रा. सिध्देश्वर कॉलनी, खेड; मूळ रा. पोखरी) या आरोपींना अटक केली आहे. यांच्यासह इतर २ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मृताच्या आईने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करत आहेत. भरवस्तीत आणि घराबाहेर झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.












