न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २८ एप्रिल २०२६) :- जुना पुणे-मुंबई हायवेवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वॅगनार कारने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लिंब फाट्याजवळील अंबिका फॅब्रिकेशनसमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक सोमेश्वर रंगनाथ काळे (वय ३४, रा. मावळ) हा आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी वॅगनार कार घेऊन जुन्या पुणे-मुंबई हायवेवरून जात होता. यावेळी त्याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन अत्यंत भरधाव वेगात चालवले.
त्याच वेळी रस्ता ओलांडणारे रामबाबू चनेश्वर राम (वय ३६) यांना या कारने भीषण धडक दिली. या धडकेत रामबाबू यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आरोपीच्या गाडीच्या पुढच्या भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई मच्छिंद्र किसन कांदळकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सोमेश्वर काळे याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गावडे करत आहेत.











