- अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी; मोठी जीवितहानी टळली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी रात्री एका इसमाने हाय टेन्शन वीजवाहिनीच्या टॉवरवर चढून धोकादायक परिस्थिती निर्माण केली. रात्री सुमारे ९.१५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
उप आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य राबविण्यात आले. ५५ मीटर उंच ब्रांटो स्काय लिफ्टच्या सहाय्याने जवानांनी कौशल्याने इसमाला सुरक्षित खाली आणले. या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना अशा धोकादायक कृती टाळण्याचे आवाहन केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.












